सोहराबुद्दीन चकमक : सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्‍तता

Foto

मुंबई- गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटरप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सर्व २२ आरोपींची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता केली आहे. देशभरात गाजलेल्या या प्रकरणाचा अखेर १३ वर्षांनंतर निकाल लागला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा हे या खटल्यात पूर्वी आरोपी असल्याने हा खटला चर्चेत होता.

 

सोहराबुद्दीन शेख यांचा मृत्यू गोळी लागूनच झाला आहे. त्याचवेळी सोहराबुद्दीन यांच्या मृत्यूमागे कोणताही कट नव्हता, असे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. शर्मा यांनी निकालपत्रात म्हटले आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांचा २००५ मध्ये तर तुलसीराम प्रजापती यांचा २००६ मध्ये कथित चकमकीदरम्यान मृत्यू झाला होता. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा आणि गुजरातच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या इशार्‍यावरूनच या बनावट चकमकी करण्यात आल्या असल्याचा आरोप होता. मात्र, २०१४ साली अमित शहा यांची या प्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली. त्यानंतर गुजरात व राजस्थानमधील अनेक पोलिसांसह २२ जणांविरोधात हा खटला चालवण्यात आला.

 

पोलिसांनी सोहराबुद्दीनचे हैदराबादमधून अपहरण केले होते, हे सीबीआयला सिद्ध करता आले नाही. जे पुरावे आणि साक्षीदार सादर करण्यात आले आहेत, त्यावरून हत्या आणि षडयंत्र रचल्याचे सिद्ध होत नाही. त्यासाठी हे पुरावे आणि साक्षीदार पुरेसे नाहीत. तुलसीराम प्रजापतींची षडयंत्र रचून हत्या करण्यात आल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.या प्रकरणात तीन लोकांना प्राण गमवावे लागले, त्याचे दु:ख आहे. मात्र, कायदा आणि व्यवस्थेला कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची आवश्यकता असते, असे न्या. शर्मा यांनी स्पष्ट केले.